भाग :२ - मानसिक आरोग्य आणि आयुष्यातील आपले प्राधान्यक्रम

 




मित्रांनो,

  मी मागेच भाग १ मध्ये  सांगितल्याप्रमाणे आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करणे हे जरी विकासाचे लक्षण असले तरी या प्रक्रियेमध्ये अत्याधिक लोक  स्वतःच्या नैसर्गिक भावनांप्रती अत्यंत कठोर आणि  असंवेदनशील बनतात. तुमचे कामाचे अधिकचेे तास , ऑफिसचे वातावरण तुमच्या मानसिक आरोग्यास त्रास देत असेल किंवा मानसिक शांती भंग करत असेल, तर ते भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महाग पडु शकते. बहुुसंंख्य लोकांना सद्य स्थितीपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचे असते ; त्यामध्ये ते सतत वेगात असतात. कामात फार व्यस्त राहतात. मानसिक दृष्ट्या सतत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात , फार दबावाखाली , नेहमी विचारात आणि अस्थिर असतात. सतत काहीतरी अधिक उत्तम शोधण्याचा प्रयत्न करणे, हे चुकीचे नक्कीच नाही परंतु सतत मानसिक आणि शारीरिक दृष्टया धावत राहणे, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थाकडे दुर्लक्ष करणे मात्र अयोग्य आहे. आपण जे शोधतोय ते सर्व का हवे आहे आणि हे सर्व मृगजळ तर नाही ना यावर कधीतरी शांत बसुन विचार करणे गरजेचे आहे. 

           दुर्दैवाने जर आज रात्री तुमचा मृत्यू झाला, तर तुमच्या कामाच्या ठिकाणी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येईल, थोडा समय लागु शकतो परंतु कामाच्या ठिकाणी कोणी ना कोणी तुमची जागा नक्कीच भरून काढेल. परंतु तुमचे प्रियजन,तुमचा परिवार, आप्त स्वःकीय यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही जाण्याने नेहमीच एक पोकळी निर्माण होईल. 

आपला जन्म व्यवसायिक आयुष्यात यशस्वी होणे, अनंत धनराशी जमवणे, आजुबाजुच्या लोकांना खर्चिक सुख उपलब्ध करून देणे, लाईटचे बील भरणे, घराच्या लोनचे हफ्ते भरणे, यासाठीच झाला होता काय? आयुष्याची तुमची संकल्पना हीच आहे का? आपण सर्व आयुष्यात इतके व्यस्त आहोत की, आपण "जगणे" विसरले आहोत. आपला जन्म होम लोनचे , पर्सनल लोनचे ईएमआय भरण्यासाठी , लाईटबिल भरण्यासाठी किंवा घराचे भाडे भरुन मरून जाण्यासाठी झालेला नाही .


जरासे थांबून , श्वास घेऊन आपण जगण्यातले सुखद क्षण "फिल" करायला नको का ?


    घाबरू नका, तुम्ही तुमच्या पाठीशी असणार आहात, काल ही होता, उदया ही असणार आहात.सकाळ होईल की नाही हे घड्याळाचे काटे ठरवत नाही फक्त आपल्याला घड्याळावर सूर्यापेक्षा जास्त विश्वास असतो इतकेच. 

          जेवढा विश्वास आपला घड्याळाच्या काटयावर असतो तेवढाच स्वतः वर दाखवा. जेव्हा तुम्ही अयोग्य गोष्टींचा पाठलाग थांबवाल, तेव्हा योग्य गोष्टी आपोआप तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतील. 

   ऑस्कर वाईल्ड म्हणाले होते, जगणे जगातील अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.बहुतेक लोक फक्त अस्तित्वात आहेत , जगत नाहीत.

तर मित्रांनो निवड पुर्णपणे तुमची आहे, 

तुम्हाला जगायचे आहे की तुम्हाला फक्त जिवंत राहायचे आहे?


आपलाच, 
रूपेश रा शुक्ल

टिप : मित्रांनो मी असे मानतो की आपली "स्वतःची" मते नेहमी इतरांच्या मतांनी प्रेरित असतात. माझा विश्वास आहे की, ज्या वेळेस मी लिहितो ते लिखाण केवळ माझे नसुन त्यावर वाचनात आलेले लेख, माझ्या गुरूंचे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन , महापुरूषांची पुस्तके आणि त्यांचे लिखाण यांचा प्रभाव असु शकतो. माझे लिखाण कदाचित अनेक लेखक आणि माझ्या आजुबाजुच्या विवेकी बुद्धीजनांमुळे प्रेरित असु शकते. या मांडणी व लेखण प्रक्रियेत कोणाला श्रेय देण्याचे राहुन गेले असल्यास मला अथवा आमच्या टीमला जरूर सांगावे. व्याकरणातील चुका दिसल्या तर सांगाव्यात आम्ही त्या निश्चित ठीक करू. या खटाटोपातुन वाचकाला तसूभरही मदत झाल्यास मला मोठा आनंद होईल.

 :- रूपेश रा शुक्ल

संस्थापक माय काउंसलर

**संपादन आणि प्रकाशन - ' टिम रुपेश रा शुक्ल '


                               


Comments