भाग : १ - मानसिक आरोग्य आणि आयुष्यातील आपले प्राधान्यक्रम
हॅरिएट टबमन एकदा म्हणाल्या होत्या , "मी एक हजार गुलामांची सुटका केली आहे, मी आणखी हजारो लोकांची मुक्त्तता करू शकले असते जर त्यांना समजले असते, कि तेही गुलाम आहेत.
मानसिक शांती की करियर ही तुलनाच चुकीची आहे. खरेतर मानसिक शांती आणि करियर ही दोन्हीही जोडीने एकमेकांचा हात धरून सोबत जाऊ शकतात . आयुष्यातील वेग जरासा कमी करून ह्या दोन्हींचे महत्व लक्षात घेतले पाहिजे कारण आयुष्यात मानसिक शांती आणि करियर या दोहोंचे स्थान मोठे आहे.
मला असे दिसुन येते की, आजच्या या जाहिरातीच्या युगामध्ये सामाजिक व आर्थिकप्रणाली अशाप्रकारे तयार केली गेली आहे की, प्रत्येक व्यक्तीला सतत कमतरतेची / काही उणीव असल्याची भावना पुन्हा पुन्हा वाटत राहावी. कदाचित आनंदी आणि समाधानी लोक सतत खरेदी करायला लावणाऱ्या आजच्या या अर्थव्यवस्थेसाठी चांगले ग्राहक नसावेत. उदा. जागतिक जाहिराती आणि स्किन केअर उत्पादनांच्या प्रसिद्धी मोहिमांचा दावा आहे की, त्याच्या उत्पादनांचा वापर करणे तुम्हाला नेहमीच तरूण दिसण्यात मदत करेल आणि वृध्दत्व रोखेल.जवळजवळ दर तीन महिन्यांनी नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन लॉन्च होत आहेत ज्यामुळे आपण विश्वास ठेवतो की आपण सध्या जे वापरत आहोत ते आता जुने झाले आहे आणि जर आपण अपग्रेड केले नाही तर आपण जुन्या गोष्टीतच अडकून राहु आणि बाकी सगळयांकडे मात्र नावीण्यपुर्वक गोष्टी असतील, यातूनच FOMO ( फियर ऑफ मिसिंग आऊट) ही संकल्पना निर्माण झाली असुन ती आता मोठी प्रसिद्ध झाली आहे. वस्तुस्थिति अशी आहे की आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करणे आणि स्वतःची उत्तम आवृत्ती (Version) बनणे हे विकासाचे लक्षण आहे, परंतु या प्रक्रियेत आपण स्वतःच्या मानसिक भावनांप्रती अधिक सजग आणि जागृत होणे गरजेचे आहे.
आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करणे हे जरी विकासाचे लक्षण असले तरी या प्रक्रियेमध्ये अत्याधिक लोक स्वतःच्या नैसर्गिक भावनांप्रती अत्यंत कठोर आणि असंवेदनशील बनतात. तुमचे कामाचे अधिकचेे तास , ऑफिसचे वातावरण तुमच्या मानसिक आरोग्यास त्रास देत असेल किंवा मानसिक शांती भंग करत असेल, तर ते भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महाग पडु शकते. बहुुसंंख्य लोकांना सद्य स्थितीपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचे असते ; त्यामध्ये ते सतत वेगात असतात. कामात फार व्यस्त राहतात. मानसिक दृष्ट्या सतत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात , फार दबावाखाली , नेहमी विचारात आणि अस्थिर असतात. सतत काहीतरी अधिक उत्तम शोधण्याचा प्रयत्न करणे, हे चुकीचे नक्कीच नाही परंतु सतत मानसिक आणि शारीरिक दृष्टया धावत राहणे, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थाकडे दुर्लक्ष करणे मात्र अयोग्य आहे. आपण जे शोधतोय ते सर्व का हवे आहे आणि हे सर्व मृगजळ तर नाही ना यावर कधीतरी शांत बसुन विचार करणे गरजेचे आहे.
संस्थापक माय काउंसलर
Comments
Post a Comment